वडझिरे : सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस बॉटलिंग कारखान्यालगत सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागली. तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत माळेगाव औदयोगिक वसाहतीतील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. वीज तारांतील घर्षणाने थिणग्या पडून कारखान्या लगतच्या जंगलाला आग लागली. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. काही वेळातच आगीची व्याप्ती वाढत असल्याने वसाहतीत ही बाब समजताच चिंता व्यक्त केली जात होती. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने औद्योगिक वसाहतीत पसरलेला तणाव दूर झाला. औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलास माहिती मिळताच केंद्र अधिकारी प्रविण घोलप, पी. पी. पाटील, ए. जे. खरता, पी. व्ही. मोरे, एस. एस. खरात, एन. ई. जाधव यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अग्निविरोधी यंत्रणेनेही आग विझवण्यासाठी मदत केली. तासाभरात आग आटोक्यात आली. हिंदूरस्थान कारखान्यात सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम चालते. आगीविरोधात विशेष सुरक्षा यंत्रणाही या कारखान्यात आहे. त्यामुळे तसे काळजीचे कारण नव्हते. परंतु, कारखान्यालगत आग लागल्याने व उंच भागामुळे हवेचा वेग पाहून माळेगाव औद्योगिक वसाहतीत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र तासभरात आग विझल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
हिंदूस्थान पेट्रोलियम कारखान्यालगत लागलेली आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:40 PM