नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर मानोरी फाट्याजवळ गुरूदत्त बबन सानप यांचे घर आहे. सानप हे पत्नी व मुलांसह येथे राहतात. सानप यांच्या घरास सोमवार (दि.२०) दुपारच्या सुमारास घरात अचानक शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील सर्व साहित्य, कपाट, सोफासेट, टीव्ही, फ्रीज, धान्य व संसारपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तसेच धान्य, शेतीची औजारे, जनावरांचा चारा जळून खाक झाला. यावेळी वावी रस्त्याकडे योगायोगाने अग्निशमन दलाचा बंब जात होता. त्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. आगीत सानप यांचे सुमारे ७० ते ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजाभाऊ वाजे, नगरसेवक शैलेश नाईक, सरपंच रामदास चकणे, सोमनाथ सांगळे, पोलीस पाटील बाळासाहेब म्हसके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के आदींनी घटनास्थळी भेट देवून सानप यांच्या घराची पाहणी करून दिलासा दिला. तलाठी राहूल कालबागेवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यात सानप यांचे सुमारे ७० ते ८० रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मानोरी येथे घराला आग; संसारपयोगी साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:54 PM