जायखेडा : बागलाण तालुक्यातील मानूर-देवळीपाडा गावाजवळील मौनीनळी पत्त्यांनीबारी येथील डोंगरावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विविध जातींची जवळपास दोन हजार पाचशे झाडे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.मानूर गावाजवळच्या देवळीपाडा गावाजवळील मौनीनळी पत्त्यांनीबारी येथील वनक्षेत्र क्र मांक १२७ मध्ये वनविभागातर्फे सहा हेक्टर क्षेत्रात विविध जातींची जवळपास तीन हजार झाडे लावण्यात आली होती. याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही सर्व झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्रीच्या अंधरात डोंगरावरील जाळ पाहून पाड्यावरील आदिवासी बांधवानी धाव घेवून शर्थीचे प्रयत्न करून झाडांच्या फांद्याद्वारे आग विझविली. यामुळे झाडांची मोठी हानी टळली असली तरी बरीचशी झाडे जळून खाक झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी अशाप्रकारे आगी लागून झाडांची हानी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून अशा आगी लागण्याचे गौडबंगाल काय? याचा शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
मानूरनजिक डोंगरावर आग, झाडे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:12 PM