हिंगणवेढे : १५ एकरावरील ऊस जळून खाकचाडेगाव : हिंगणवेढे शिवारात रविवारी सकाळी उसाच्या शेतात आग लागल्याने लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला. हिंगणवेढे शिवारात विष्णू धात्रक, शांताराम धात्रक, अनिल धात्रक , विलास सांगळे , राजू धात्रक यांचे एकमेकाला लागून उसाचे जवळपास १५ एकरचे शेत आहे. रविवारी सकाळी शेतकरी व मजूर शेतात काम करत असताना अचानक उसाच्या शेतातून धूर येऊ लागल्याने सर्वांची पळापळ झाली. मात्र काही वेळातच उसाच्या शेतास लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. परिसरातील शेतकरी व युवक यांनी तातडीने आग विझविण्यासाठी परिश्रम घेतल्याने काही वेळातच आग आटोक्यात आली. मात्र जवळपास १४-१५ एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. दुष्काळामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना या आगीमुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. उसाच्या शेतात आग लागल्याची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महसूल विभागाकडून उसाच्या शेतात लागलेल्या आगीचे पंचनामे करण्यात आले आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)
उसाच्या शेताला आग; लाखोंचे नुकसान
By admin | Published: September 28, 2015 11:00 PM