वणी : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानाचे फर्निचर, फ्रीज खाक झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील मोबाइल दुकानातील अॅक्सेसरिज जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात अग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचणींचासामना करावा लागला, मात्र नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शुक्रवारी मध्यरात्री येथील जगदंबा स्वीट्स या दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. नंतर तत्काळ दुकानाचे मालक अमोल गांगुर्डे यांना कळविण्यात आले. तर आगीने शेजारीच असलेल्या अथर्व मोबाइल दुकानाला वेढले. दुकाननातील काही साहित्य नागरिकांनी बाजूला काढले. तर जवळच असलेल्या वडापावच्या दुकानात असलेले काही गॅस सिलिंडर नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी हलविले. बादल्यांमधून पाणी टाकून आग आटोक्याचे प्रयत्नही सुरू होते. काही वेळात टॅँकर येताच पाण्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले.या घटनेत दोन्ही दुकानांचे चार लाख सत्तर हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. शहरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचण येत आहे. यापूर्वीही आतापर्यंत पाच ते सहा वेळेस दुकानांना आग लागण्याची घटना घडली आहे, परंतु पिंपळगाव किंवा नाशिक या ठिकाणावरून अग्निशमन बंब मागवून त्यावर नियंत्रण मिळवावे लागते. त्यामुळे वणी येथे अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वणी येथे मिठाईच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 7:15 PM
वणी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानाचे फर्निचर, फ्रीज खाक झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील मोबाइल दुकानातील अॅक्सेसरिज जळून खाक झाल्या.
ठळक मुद्देअग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचण; सुदैवाने अनर्थ टळला