पंचवटी : दिंडोरी रोडवरील जलविज्ञान प्रकल्पात असलेल्या झाडाझुडपांना पाटकिनारच्या झोपडपट्टीतील काही टवाळखोरांनी आग लावून दिल्याची घटना बुधवारी (दि. १८) दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाचे जवान व पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाळलेले गवत व झाडाझुडपांना लागलेली आग पाण्याचा मारा करून आटोक्यात आणली. या आगीत काही छोटी झाडे जळून खाक झाली, तर मोठ्या झाडांना आगीच्या झळा बसल्याने ते अर्धवट जळाले आहेत. दिंडोरी रोडवर शासनाचे महाराष्ट्र जलविज्ञान प्रकल्प कार्यालय असून, या कार्यालय परिसरात समोरील पाटालगत राहणाऱ्या झोपडपट्टीतील टवाळखोरांचा कायमच मुक्तपणे वावर असतो. कधी उभ्या झाडांची कत्तल करणे, तर कधी मोरांची शिकार करण्यापाठोपाठ कार्यालयाची भिंत तोडफोड करण्याचे काम टवाळखोर करतात. अशाच प्रकारे टवाळखोरांनी काहीतरी पेटती वस्तू वाळलेल्या पालापाचोळ्यावर फेकल्याने आग लागली. या आगीत अनेक छोटी झाडे जळून खाक झाली, तर मोठ्या वृक्षांनाही आगीने वेढा मारल्याने ते अर्धवट जळाले आहेत. जलविज्ञान प्रकल्प तसेच मेरी हायड्रो जंगलात परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया टवाळखोर युवकांचा कायमच उपद्रव असल्याने पोलिसांनी त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
जलविज्ञान प्रकल्पातील झाडांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:33 AM