कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद व दोन्ही कार्यालयांना एकाच वेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागते हे संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. कोल्हापूर फाटा येथील जलसंपदा विभागाच्या या दोन्ही कार्यालयांना आमदार गावित, गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. मुसळे व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी सोमवारी कार्यालयाची पाहणी केली. महावितरणचे पथक मंगळवारी येऊन पहाणी करणार असून, याबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी पहाटे लागलेली आग संशयास्पद असल्याचे बोलले जात असून या आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह ३०० हून अधिक गठ्ठ्यातील हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. शॉटसर्किटचा लावलेला अंदाज संशयास्पद असल्याने या जळीतकांडाची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन करणार असल्याचे आमदार गावीत यांनी यावेळी सांगितले. दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या शौचालय व बाथरूम व कार्यालयप्रमुख यांच्या कक्षास आग का लागली नाही ? या ठिकाणी चौकीदार का नव्हते ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, भ्रष्टाचारची चौकशी होण्यासाठी काही समाजसेवकाकडून माहिती अधिकार कायदाअंतर्गत मागणी करण्यात येत असल्यामुळेच कागदपत्र जाळण्याची चर्चा रंगली आहे. आमदार गावीत यांच्यासमवेत माकप सरचिटणीस मोहन जाधव, हेमंत पाटील बाळासाहेब गांगुर्डे, टिनू पगार, काशिनाथ गायकवाड , दामू पवार रशीद शेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आगीत पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा या दोन वेगवेगळया उपविभागातील कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोल्यांना आग लागली कशी याबाबत शंका व कुशंका निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही उपविभागाच्या जळालेल्या खोलीमध्ये अंतर अधिक आहे शिवाय दोन्ही उपविभागाच्या कार्यालयामध्ये शौचालये असून फक्त कागदपत्राच्या खोलीला आग लागली दोन्ही प्रमुखांच्या कक्षाला आग लागली नाही.
जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील आग संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:57 AM