नाशिक : सध्या सर्वच वस्तूंच्या होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवाळीच्या फराळावरदेखील महागाईचे सावट आहे; मात्र आनंदाची बाब म्हणजे यावर्षी फटाके स्वस्त होणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी बाजारभावात घट होणार आहे.गेल्या वर्षी व्यावसायिकांना फटाक्याच्या मालावर तीन टक्के एलबीटी कर भरावा लागत होता; मात्र आता एलबीटी रद्द झाल्याने यावर्षी शहरात विक्रेत्यांना किमान दहा टक्क्यांनी फटाक्याच्या किमतीमध्ये घट करावी लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांना गत वर्षाच्या तुलनेत फटाके कमी दराने मिळणार आहेत. पाच ते दहा वर्षांपूर्वी शहरात किमान चार ते पाच दिवस फटाक्याचा बार करून दिवाळी साजरी केली जात होती; मात्र या दिवसात होणाऱ्या वायू, ध्वनी, प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत प्रबोधन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फटाक्यांचा आवाज जनजागरणामुळे दबला आहे. नागरिक कमी प्रमाणात व इको फ्रेण्डली फटाके केवळ लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला वाजवून दीपोत्सवाचा आनंद लुटताना दिसून येतात. गेल्या वर्षीदेखील दीपोत्सवामध्ये फटाक्याचा आवाज जनजागृतीमुळे कमी झाल्याचे फटाका विक्रीवरून लक्षात आले होेते. गेल्या वर्षी एलबीटी आणि महागाई यामुळे फटाक्यांच्या किमतीदेखील अधिक होत्या. परिणामी नागरिकांनी फटाके खरेदीचे प्रमाण घटविणे पसंत केले होते. यावर्षी महापालिकेचा एलबीटी कर रद्द झाल्यामुळे शहरात फटाके स्वस्तात फुटणार असल्याचे बोलले जात आहे; मात्र जनजागृती व दुष्काळाची स्थिती यामुळे नागरिक फटाके खरेदी करतील किंवा नाही या चिंतेत व्यावसायिक असून, यंदाचा दसरा व गत वर्षाच्या दिवाळीच्या अनुभवातून धडा घेत योग्य प्रमाणात फटाका माल खरेदी करण्यावर भर दिला आहे.
दिवाळीला फुटणार स्वस्तात फटाके
By admin | Published: October 27, 2015 10:30 PM