नाशिक : काही महिन्यांपूर्वी राज्यात कथित अग्निशमन घोटाळा गाजला असताना, शहराच्या सांस्कृतिक विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित, प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेतही अग्निशमन घोटाळा घडल्याचा आरोप होत आहे. गेल्या वर्षी सावानात बसवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणेवर तब्बल ४५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या व्यवहारात अनेकदा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप घेतला जात आहे. एवढा खर्च करूनही सावानाला अद्याप या कामाच्या पूर्णत्वाचा दाखलाच मिळालेला नसल्याचा दावाही केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१२ च्या ६ मे रोजी सावानात अग्निशमन यंत्रणा बसवण्यासंदर्भात कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रथम चर्चा करण्यात आली, तर सन २०१४ च्या २८ मार्च रोजी या कामापोटीच्या रकमेचा अखेरचा हफ्ता संबंधित कंपनीला सुपूर्द करण्यात आला. तथापि, या कालावधीत झालेल्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर बाबींचे उल्लंघन करण्यात आले. संस्थेच्या घटनेतील तरतुदी व धर्मादाय संस्थांबाबत असलेल्या सर्वसाधारण नियमानुसार पाच हजार रुपयांच्या वर करावयाच्या खरेदी किंवा कामांबाबत निविदा सूचना प्रसिद्ध करून, आलेल्या निविदांतील कमीत कमी खर्च सांगणाऱ्या निविदाधारकाकडून संबंधित खरेदी वा काम करून घेणे संस्थेवर बंधनकारक आहे; मात्र सावानात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात संस्थेच्या आवारात बसवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणेवर सुमारे ४५ लाख रुपयांचा खर्च करूनही यासह अन्य कामांसाठी एका वृत्तपत्रात केवळ छोटी जाहिरात प्रसिद्ध करून देकार मागवण्यात आले. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, ही जाहिरात १ ते ३ जून २०१३ या कालावधीत प्रसिद्ध झाली असताना, जाहिरातीत १० मे २०१३ पर्यंत देकार पाठवावेत, असा उल्लेख आहे. म्हणजे देकार पाठवण्यासाठी नमूद करण्यात आलेली तारीख उलटून गेल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत अधिक विचारणा केली असता, ही जाहिरात १ ते ३ जून २०१३ दरम्यान प्रसिद्ध करण्यात आल्याचे शुद्धिपत्रक नंतर सावानाकडून देण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयातही अग्निशमन घोटाळा?
By admin | Published: September 27, 2015 12:14 AM