इंदिरानगर : परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा विरोध लक्षात घेता अखेर मनपा प्रशासनाने १०० फुटी रस्त्यालगत असलेल्या उपकार्यालयाजवळील छोट्या मैदानावरील फटाक्यांची दुकाने स्थलांतरित केली.गेल्या वर्षी लोकसुविधा केंद्रातील उपकार्यालयालगतच्या त्रिकोणी मैदानावर भरवस्तीत फटाक्यांच्या दुकानास नागरिकांचा विरोध असताना यंदाही तेथेच फटाक्यांची दुकाने लावण्याचा मनपाचा आग्रह असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी भरवस्तीत फटाक्यांच्या दुकानास परवानगी कशी दिली यावरून परिसरातील नागरिकांनी विरोध केला आणि नगरसेवक सतीश सोनवणे व अर्चना जाधव यांच्याकडे दुकाने हलविण्याची मागणी केली होती. नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यंदा परवानगी दिली गेली आहे; परंतु पुढील वर्षी देणार नाही असे आश्वासन दिले होते. पुन्हा त्याच ठिकाणी प्रशासनाने फटाक्यांच्या दुकानांचा आग्रह धरल्याने नागरिकांनी व नगरसेवकांनी पत्रकाद्वारे भरवस्तीत फटाक्यांची दुकाने देऊ नये, अशी मागणी केली. याची दखल घेत फटाक्यांची दुकाने इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. (वार्ताहर)