नाशिक- मालेगाव येथील एमआयएमचे माजी महापौर अब्दूल मलीक यांच्यावर चार दिवसांपूर्वी झालेला गोळीबार हा व्यक्तीगत वादातून नव्हे तर राजकीय वादातूनच झाला आहे. मालेगावमधून एमआयएमचे बसलेले बस्तान उखडवण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप खासदार इम्तीयाज जलील यांनी केला आहे. येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे.
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री गोळीबार झाला होता. त्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याने नाशिकच्या पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पाश्व'भूमीवर इम्तीयाज जलील यांनी आज या रूग्णालयात जाऊन अब्दुल मलीक यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जलील यांनी या प्रकरणाला वेगळी दिशा दिली जात असल्याचा आरोप केला. अब्दूल मलिक आणि त्यांच्या बंधूंनी मालेगाव मध्ये एमआयएमचा प्रचार प्रसार करून अस्तीत्व निर्माण केले. त्यामुळे आमदार महापौरपद मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर एमआयएमचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी हा गोळीबार झाला असल्याचेही जलील म्हणाले.
मालेगावमधील गोळीबार ही केवळ आताची घटना आहे, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर तर विधानसभेपर्यंत आणखी भयंकर स्थिती होणार आहे. बंदूकीच्या जेारावरच विरोधकांमध्ये भीती निर्माण केली जाईल असे ते म्हणाले.
संभाजी नगरात सर्वात मोठा जल्लोष
लोकसभा निवडणूकीचा ४ जून रोजी निकाल लागणार आहे. हा निकाल काय असेल तो पहायचा असेल तर छत्रपती संभाजी नगर येथे बघा. सर्वात मोठा जल्लोष येथेच होईल असे इम्तीयाज जलील म्हणाले.