लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पेठरोडवरील बाजार समितीत भरेकरी व्यवसाय करणाऱ्या संदीप लाड या युवकाने हप्ता दिला नाही या कारणावरून कुरापत काढून त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव या तिघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून, तर संदीप पगारे यास नाशिकमधून शुक्रवारी (दि़३०) ताब्यात घेतले़पेठरोडवरील डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारील हॉटेलमध्ये मित्रांसमवेत गुरुवारी (दि. २९) चहा पिण्यासाठी गेलेल्या फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) याच्यावर गोळीबार करून जखमी केल्याची घटना घडली होती. शेखर निकम यास लाड याने हप्ता दिला नाही या कारणावरून संशियतांनी पाळत ठेवली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लाड हॉटेलमध्ये असताना संशयित पेठरोडवरील हॉटेलमध्ये आले त्यावेळी केतन निकम याने त्याच्याकडील बंदुकीतून लाड गोळी झाडली होती़ त्यात लाडच्या छातीजवळ गोळी लागल्याने तो जखमी झाला व संशयित फरार झाले़ पेठरोडवर भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांची पळापळ झाली होती. या प्रकरणी जखमी लाड याचा नातेवाईक सुरज बोडके याने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित शेखर निकम, केतन निकम, संदीप पगारे, विशाल भालेराव व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी परिसरात सापळा रचून प्रथम संदीप पगारे यास ताब्यात घेतले होते, तर उर्वरित संशयित पसार झाल्याने त्यांच्या शोधार्थ विविध भागांत पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पूर्ववैमनस्य की हप्ता वसुली ? संदीप लाड या युवकावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी पेठरोडवर घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सहा-सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी लाड व संशयित यांच्यात हप्ता न दिल्याच्या करण्यावरून वाद होता की सावकारी व्यवसाय या दोन्ही बाजूंचा पोलिसांकडून तपास सुरू आहे़, तर दुसरीकडे संशयित शेखर निकमचा भाऊ किरण निकम याचा काही दिवसांपूर्वीच खून झाला असून, त्या वादातून गोळीबाराची घटना घडली याचाही तपास पोलीस करीत आहे.
गोळीबार करणारे चौघे संशयित ताब्यात
By admin | Published: July 01, 2017 12:20 AM