नाशिक : आदिवासी जमातीला कलागुणांची देणगी उपजतच असते. वारली चित्रकलेपासून लाकडी कामट्यांद्वारे विविध प्रकारच्या वस्तूनिर्मितीची हस्तक लाही त्यांना अवगत असते. मात्र त्यांच्या पारंपरिक कलाकुसरला शास्त्रोक्त प्रशिक्षण अन् यांत्रिकीकरणाची जोड अपवादानेच लाभते. जिल्ह्णातील आदिवासी बहुल भागातील आदिवासी कला अद्यापही उपेक्षितच राहिली आहे. त्यामुळे वन मंत्रालयाच्या बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून आदिवासींच्या कलेला ‘बुस्ट’ देण्यात येणार आहे. उत्तर महाराष्टतील पहिले बांबू क्लस्टर नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अती दुर्गम गुजरात हद्दीला लागून असलेल्या वनपरिक्षेत्रात आकारास येणार आहे.आदिवासी तालुक्यांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण भागातील पंचक्रोशीतील काही दुर्गम आदिवासी गाव, पाडे हे गुजरात सीमेच्या अगदी जवळ आहेत. या पंचक्रोशीची निवड करून या भागातील आदिवासींच्या कलेला शास्त्रीय प्रशिक्षण अन् यांत्रिकीकरणाची जोड देत बांबूच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आकर्षक देखण्या वस्तूंच्या निर्मितीसाठी ‘बांबू क्लस्टर’ साकारण्याचा राज्य बांबू विकास मंडळाचा मानस आहे. यादृष्टीने आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. उंबरठाण भागातील पंचक्रोशीमधील पारंपरिक कारागिरांच्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांची वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार आहे.जे आदिवासी कारागीर सध्या बांबूंपासून पारंपरिक शोभेच्या वस्तू बनवून जवळच्या पर्यटनस्थळांवर विक्री करतात त्यांची उत्पादनक्षमताही यामुळे वाढणार आहे.मध्यवर्ती सुविधा केंद्र‘बांबू क्लस्टर’ प्रकल्पांतर्गत मध्यवर्ती सुविधा केंद्र (सीएफसी) या भागात कार्यान्वित करण्यात येईल. या केंद्रात आवश्यक ती यंत्रसामग्री मंडळ पुरविणार आहे. हे केंद्र सुरुवातीला मंडळाच्या नियंत्रणाखाली असेल त्यानंतर लोकांनी लोकांसाठी चालविण्याचे केंद्र म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या धर्तीवर एक समिती गठित करून त्या समितीकडे कें द्र सोपविले जाणार आहे. या केंद्रातून बांबूवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक त्या यंत्रसामग्रीचा आधार आदिवासींना दिला जाणार आहे.बेरोजगारीवर होणार मात : नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या वनपरिक्षेत्राचा आदिवासी बहुल भाग हा गुजरात हद्दीला लागून आहे. या भागात रोजगाराची भीषण समस्या असून, पावसाळ्यानंतर रोजगारासाठी येथील आदिवासींना भटकंती करावी लागते. यामुळे काही स्थानिक लोक आमिषापोटी तस्करांची साथ देतात. बेरोजगारीवर मात करून आदिवासींच्या कलागुणांना वाव देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी वनविभागाने पाऊल टाकले आहे. ‘बांबू क्लस्टर’सारखा प्रकल्प त्याचाच एक भाग मानला जात आहे.
पहिले ‘बांबू क्लस्टर’ साकारणार नाशकात
By अझहर शेख | Published: March 24, 2019 12:44 AM