कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. बागुल बंधूंनी योग्य नियोजन करून लखनौ जिविलास या जातीच्या पेरू बागेची लागवड केली. पहिल्याच तोड्याला सुमारे ६०० ते ७५० ग्रॅम वजनाचे फळ तयार झाले असून, त्यांना पहिल्याच तोड्यात सुमारे साठ ते सत्तर हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्येक हंगामानुसार उत्पन्न वाढत असून, वर्षाकाठी सुमारे पाच ते सहा लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बागुल यांनी पेरूबागेत हरभºयाचे आंतरपीक घेऊन त्यातूनही सुमारे ५ क्विंटल उत्पन्न घेतले. त्यांच्या पेरूबागेस तालुक्यातील शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत. बागुल यांची सुमारे दोन एकर द्राक्षबाग आहे. त्याचे योग्य नियोजन केल्याने ही बागही त्यांना भरघोस उत्पन्न देत आहे. त्यातूनच प्रेरणा घेत बागुल यांनी पेरूबाग फुलवण्याचा विचार केला. पेरूबाग लावण्या-संदर्भात त्यांनी माहिती घेऊन नियोजन केले. पेरूबाग लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाचा खर्च आला. लखनौ येथून जिविलास जातीची सुमारे १०५० रोपे आणून जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली. दोन ओळींमध्ये सुमारे साडेआठ फुटांचे, तर दोन झाडांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवून रोपांची लागवड केली. बागेची लागवड करण्यापूर्वी बागुल यांनी शेताची नांगरणी करून बेड तयार केले. त्या बेडवर सुमारे एक ते दीड फुटाचे खड्डे घेऊन त्यात शेणखत, १०-२६-२६, पोट्याश, सुपर फोस्फेट, थायमेट आदींचे योग्य प्रमाण करून खड्ड्यात टाकले. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय करून रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला. लागवड केल्यानंतर सुमारे सहा महिने झाडांवर फुलकळी ठेवली नाही. रोप कमरेबरोबर आल्यावर त्याचा शेंडा खुडून घेतला व नंतर येणाºया कळ्यांमधून पेरूचे उत्पादन घेतले. यात पहिल्याच तोड्यातून सुमारे ७० ते ७५ क्रेट उत्पादन निघाले. त्यास सरासरी ६० ते ७० रु पये प्रतिकिलो भाव मिळाला. परिसरातील आठवडे बाजारात पेरुची विक्री केली. शेंडे ेखुडल्याने मोठ्या प्रमाणात फुलकळी येत असून, त्यामुळे वर्षभर बागेत पेरू उपलब्ध होणार आहे. आता दुसºयांदा झाडांची छाटणी केली असून, फळ सेट होत आहे. सध्या एका झाडास सरासरी ३० ते ५० पर्यंत फळे लागली आहेत. यातील काही फळांची छाटणी करून योग्य फळच झाडावर ठेवावे लागणार आहे. फळे लागल्यामुळे बागेला सुमारे तीनवेळा औषध फवारण्या कराव्या लागणार आहेत. फळ वाढीसाठी प्रोफेक्स २५ मिली प्रत्येकी २०० लिटर पाण्याचे प्रमाण घेऊन फवारणी केली. इजिस्टीम २५० मिली प्रति २०० लिटर पाण्यातून दिले जाते. तसेच ०५२ .३४ २५ किलो जमिनीतून झिंक बोरॉन १०० ग्राम २०० लिटर पाण्यातून दिले जाते. झाडांवर मिलीबग व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून न्युओन प्रोफेक्स बायोस्टीमची फवारणी केली जात आहे. निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे शेतकºयांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक बदल करीत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. पेरूबागेसाठी मनुष्यबळ तसेच खर्चही कमी येत असून, त्यातून नफा जास्त मिळत आहे. शेतकरी वर्गाने बाजारपेठेत मालाची गरज ओळखून पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. फळबागांची लागवड करणे योग्य ठरणार आहे.- भाऊसाहेब बागुल, पेरू उत्पादक शेतकरी, पाटोदा