नाशिक : ‘आय लव्ह माय नाशिक’ या उपक्रमांतर्गत नाशिकच्या कॅलिग्राफी कलावंतांनी एकत्र येत सीबीएस बसस्थानकाचा कायापालट करून दाखविला आहे. हॅन्ड फाउंडेशनच्या संकल्पनेतून कॅलिग्राफी कलावंतांनी स्थानकाच्या भिंतींचा कॅनव्हास केला आणि एखाद्या कलादालनासारखे संपूर्ण बसस्थानक बदलून गेले. होतकरू तरुण-तरुणींच्या कलासक्त हातातून कलाकृतीने रंगलेले हे राज्यातील पहिले बसस्थानक ठरले आहे. आपल्या शहरासाठी आपण काय करू शकतो आणि प्रेम केवळ माणसांवर नाही तर आपल्या शहरावरही करता येते, असा संदेश देत हॅन्ड फाउंडेशनने स्थानकाचा कायापालट करून दाखविला आहे. या उपक्रमासाठी शहरातील इंटेरिअर डिझाइनर, फोटोग्रार्फस, फाईन आर्ट आर्टिस्ट तसेच कलाक्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला हात दिला असून, त्यांच्या संकल्पनेतून बसस्थानकातील भिंती बोलक्या झाल्या आहेत. के. के. वाघ, ललित कला महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालयातील उदयोन्मुख तरुण चित्रकार विशेष सहभागी झाले आहेत. नाशिकवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हॅन्ड फाउंडेशनचे अध्यक्ष ललित महाजन, उपाध्यक्ष नेहा महाजन आणि त्यांचे सहकलावंत मोहिनी येवलेकर, ध्रुव राठोड, आदित्य देशमुख, बापू सातपुते, स्वप्नील आहिरे, अनिष ठिया यांनी नाशिकच्या कलावंतांना साद घातली होती. त्यांच्यासाठी ग्रॅफिटी स्पर्धा घेत प्रत्येकाला स्थानकाची भिंत कॅनव्हॉस म्हणून दिली आणि स्थानकाच्या कानाकोपºयाला रंग आला. सुमारे दोनशे कलावंतांनी फाईन आर्ट्सच्या माध्यमातून बालमजुरी, बसस्थानकातील शिष्टाचार, स्वच्छता, बेटी बचाव, महिला सुरक्षितता, ध्वनिप्रदूषण, वाहतुकीचे नियम आणि एसटीच्या आठवणी या विषयावर चित्रकारांकडून स्पर्धात्मक चित्रे रंगवून घेण्यात आली आहेत. सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्र असलेल्या नाशिकची परंपरा चित्राच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. के. के. वाघ, ललित कला महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय, के. टी. एच.एम. महाविद्यालयातील उदयोन्मुख तरुण चित्रकार यांनी रंगाच्या माध्यमातून भिंतीत जीव ओतला आहे. बसस्थानकातील आतील आणि बाहेरील बाजूने रंग देण्यात आला असून, खाबांवर कार्टुन्सची चित्रे काढण्यात आली आहेत. तर भिंतींवर चित्रे चितारण्यात आली आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना काढण्यात आलेल्या चित्रांनी स्थानकाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे तर संरक्षक भिंतींवर प्रबोधनात्मक कॅलिग्रॅफी झळकत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या या तरुणांच्या कार्यकौशल्याची दखल घेत मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी केली. संपूर्ण स्थानकाचा कायापालट झाल्याचे पाहून त्यांनीही एकीकडे तरुण भरकटत असताना या तरुणांनी जपलेली कला नाशिकच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. इतर तरुणांनी या तरुणांचा आदर्श घेण्यासारखे हे स्थानक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅलिग्राफीने रंगले पहिले बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:39 AM