नाशिक : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच अभयारण्य माणसांसाठी बंद करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात माणसांची वर्दळ नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पूर्णपणे थांबली आणि मार्चअखेरही जलसाठा मुबलक प्रमाणात टिकून राहिल्याने सुरक्षित अधिवासाची खात्री चित्रबलाक (पेंटेड स्टोर्क) या स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांच्या जोडप्यांना पटली असावी. त्यामुळे त्यांनी येथील बाभळीच्या झाडांवर घरटी तर बांधलीच, शिवाय तेथे आपले कुटुंबही वाढविले. नांदूरमधमेश्वरच्या इतिहासात प्रथमच या पक्ष्याकडून मुक्कामी राहून प्रजनन केल्याची नोंद नाशिक वन्यजीव विभागाने केली आहे.नांदूरमधमेश्वर अभयारण्याला ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होताच येथील जलाशयाचा परिसर विविध पक्षी, जलचारांसाठी सुरक्षित अधिवास आहे यावर शिक्कामोर्तब झाले. आपले कुटुंब वाढविण्यासाठी पोषक वातावरण असल्याची खात्री करून घेत फेब्रुवारीच्या अखेरीस या प्रजातीच्या पक्ष्यांच्या तीन जोडप्यांनी सामूहिकपणे घरटी बांधून त्यामध्ये अंडी घातली. त्यामुळे ‘चित्रबलाक’च्या जोडप्यांनी मार्च महिन्याच्या सुरु वातीला अभयारण्यातून स्थलांतर करण्याऐवजी मुक्काम करणे पसंत केले. या महिन्याच्या प्रारंभीच ‘चित्रबलाक’ची सहा पिल्ले जन्मली असूून, नांदूरमधमेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याची नोंद झाली. त्यामुळे हे या अभयारण्याच्या भविष्याच्या दृष्टीने शुभवर्तमान मानले जात आहे, असे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले.
नांदूरमधमेश्वरमध्ये प्रथमच ‘चित्रबलाक’चे प्रजनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:30 PM