कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत उपक्र माच्या माध्यमातून आरोग्य संस्थांसाठी राबविण्यात आलेल्या कायाकल्प अभियानात कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये आमूलाग्र बदल घडवून नागरिकांना विविध सुविधा व स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी कायाकल्प अभियान राज्यभरात राबविण्यात आले. राज्यभरातील उपजिल्हा रुग्णालय स्तरावरच्या सुमारे ५०० आरोग्य संस्थांनी यात सहभाग नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील दहा संस्थांचा समावेश होता. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाने या कायाकल्प अभियानात प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. कळवण शहरात सर्वसुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू कळवण शहराच्या वैभवात भर घालणारी असून, अभियानात उपजिल्हा रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, मुख्य इमारतीची संरक्षक भिंत व कमानीचे बांधकाम, संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून घ्यावयाची काळजी, अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे कौशल्य,या संदर्भातील घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून ही निवड समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कायाकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी-साठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुलाबराव सोनवणे, डॉ.अनंत पवार, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.नीलेश लाड, यांनी विशेष प्रयत्न केले.(वार्ताहर)