अझहर शेख, नाशिक : हेमाडपंती शैलीमधील यादवकालीन चामुंडेश्वरी माता मंदिराचे काही अवशेष नदीकाठालगत आजही शिल्लक आहे. मंदिराची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुरूस्ती करणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य पुरातत्व विभाग या मंदिराचा वारसा जतन करण्यासाठी थेट हुबेहुब वास्तू दुसऱ्या जागेवर नव्याने मंदीर साकारण्यासाठी सरसावले आहे. यासाठी ‘थ्रीडी इमेज’चा वापर करण्यात येणार असून तसा प्रस्ताव पुरातत्व विभागाने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात तापीनदीच्या काठी वसलेल्या चवळदे गावाच्या शिवारात पुरातन यादवकालीन चामुंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. नदीकाठाची जमीन असल्यामुळे ती पाण्याने खचल्याने मंदीराची अधिकच पडझड झाली. या मंदिराची देखणी वास्तू पडल्यामुळे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचला जावा यासाठी, राज्य पुरातत्व विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपुर्वीच राज्य पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने पडझड झालेल्या मंदिराच्या ठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण केले. या पथकाने मंदिराविषयी आवश्यक ती सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर, मंदिराचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी थ्री-आयामी (थ्रीडी) स्कॅन आणि थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून वापरून मंदिराची रचनाकृती तयार करण्यात आलीि आहे. मंदीर पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पथकाने तंज्ञज्ञानाचा कौशल्याने वापर केला आहे. यानुसार मंदिराची आकृती पुढे आली असून तीदेखील हेमाडपंती शैलीची भासते. मंदिराचे सुरक्षित जागेवर स्थलांतर करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक ती माहिती मिळविली जात आहे. सुमारे दहा कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पुरातत्व विभागाकडून मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास उपलब्ध निधीनुसार विविध टप्प्यांमध्ये मंदिर बांधणीच्या कामाला पुरातत्व विभागाकडून सुरूवात केली जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली.
असुरक्षित स्मारकांच्या यादीत स्थानचामुंडेश्वरी माता मंदिराचे स्थान राज्याच्या पुरातत्व विभागाच्या संरक्षित वास्तूमध्ये नाही. त्यामुळे या मंदिराची वास्तू असुरक्षित राहिली. परिणामी वेळोवेळी पडझड रोखण्यास प्रशासनालाही अपयश आले. तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. यासाठी पुरातत्व विभाग मंदिराच्या रचनांचे वेगवेगळे थर थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करणार आहेत.