मालेगाव मध्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विश्वस्तांनी मशिदींना कुलूप लावले. त्यामुळे मुस्लीम समाजबांधवांनी प्रथमच घरातच जुमाची नमाज अदा केली. शहराच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी.शहरात सुमारे चारशेहून अधिक मशिदी आहेत. इस्लाम धर्मतत्त्वानुसार दिवसातून पाच वेळ व जुमाची नमाज पठण करणे क्रमप्राप्त आहे. अनेक बांधव काही कारणास्तव पाच वेळची नमाज पठण करीत नसल्याने जुमाच्या नमाजला आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे जुमाच्या नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी कायम असल्याने चारपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही. मशिदीमध्ये नमाजींची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विश्वस्तांची बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले होते, तर पोलीस प्रशासनाने त्यादृष्टीने नोटिसा बजावल्या आहेत. शुक्रवार असल्याने जुमाची नमाजला होणारी गर्दी टाळण्यासाठी विश्वस्तांच्या वतीने समाजबांधवांनी घरीच नमाज पठण करून सहकार्य करावे, असे आवाहनाचे फलक मशिदीबाहेर लावण्यात येवुन मशिदींना कुलूप लावण्यात आले होते. समाजबांधवांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण मानली जाणारी जुमाची नमाज घरीच अदा केली.शुक्रवारी यंत्रमाग कामगारांना सुट्टी असल्याने आपल्या पूर्वजांच्या कबरींची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी शब-ए-बरात पूर्व येणाऱ्या शुक्रवारी शहरातील बडा कब्रस्तानात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधवांची गर्दी असते. येत्या बुधवारी होणाºया शब-ए-बरातच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गर्दी नव्हती. परिणामी कब्रस्तानात शुकशुकाट दिसून आला.
मालेगावात प्रथमच शुक्रवारची नमाज घरात; मशिदींना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:23 PM