नाशिक : शहरातील एका ११ वर्षांच्या मुलाला झालेल्या दुर्धर रक्ताच्या कर्करोगावर (ब्लड कॅन्सर) उपचारासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आलेले ‘हाफ मॅच बोन मॅरो ट्रान्सप्लांट’(अस्थिमज्जा प्रत्यारोपण) यशस्वी झाले आहे.
या उपचारासंदर्भात अधिक माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. नीलेश वासेकर म्हणाले, ११ वर्षांच्या मुलाला दुर्धर रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तब्बल दोन वर्षे उपचार घेऊनही त्याला आजाराने पुन्हा ग्रासल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा एकमेव पर्याय उरलेला होता. या शस्त्रक्रियेसाठी दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचे वैद्यकीय नमुने त्या मुलाच्या नमुन्यांशी जुळले नाहीत. अशा परीस्थितीत हपलो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला रुग्णाच्या कुटुंबीयांना देण्यात आला. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत स्टेमसेल्स (एचएलए) अर्धा मॅच झालेला असला तरी चालतो. कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर रुग्णाच्या वडिलांकडून स्टेमसेल्स घेण्यात आल्या. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर गत आठवड्यात या रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, मुलाचे वडील तर डोनेशननंतर दोनच दिवसात कामावर जाऊ लागल्याचेही डॉ. वासेकर यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली. मुंबईतील उपचारांच्या तुलनेत निम्म्या रकमेत उपचार झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा स्वरूपाच्या गुंतागुंतीच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये शक्य झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला असल्याचे डॉ. वासेकर म्हणाले. यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील पारख यांनी सांगितले, ज्या मुलांना अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी अशोका मेडिकव्हर हे एक आदर्श हॉस्पिटल आहे. जे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह संपूर्ण अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मेडिकव्हरचे सेंटरहेड रितेश कुमार यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्यासाठी मेडिकव्हर सदैव सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी क्लस्टरहेड सचिन बोरसेदेखील उपस्थित होते.