पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील अश्विनीनगर येथे राहणाऱ्या अंगणवाडीसेविका चारुलता अशोक पाटकरी (६२) सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्याने कर्मा हाइट्स पाठीमागील म्हाडा वसाहत येथील अंगणवाडी कार्यालयात पायी जात होत्या. याच दरम्यान, पाथर्डी फाटा परिसरातील नागरे मळाजवळ पाटकरी यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीने आलेल्या भामट्याने त्यांना पाथर्डीकडे जाण्याचा रस्ता विचारला. त्यावर पाटकरी यांनी मलादेखील तिकडेच जायचे असे सांगून लिफ्ट मागितली व त्याच्या दुचाकीवर बसले. भामट्याने त्यांना म्हाडा वसाहतीजवळ सोडले असता, त्याचवेळी भामट्याने पाटकरी यांच्याकडे त्यांचा भ्रमणध्वनी मागितला व मित्राला फोन करतो, असा बहाणा केला. फोन लागला नाही असे सांगून पुन्हा फोन परत केला. पाटकरी ह्या फोन पर्समध्ये ठेवत असताना भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने खेचून वडाळा-पाथर्डी रस्त्याकडे पलायन केले.
चाैकट
सीसीटीव्हीत भामटा नजरेत
इंदिरानगर पोलिसांनी ज्या मार्गावरून पाटकरी यांना भामट्याने दुचाकीवर बसवून नेले, त्या मार्गातील खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यात अनेक ठिकाणी तो नजरेत आला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.