नाशिक : शहरातील बहुतेक नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी ९२ टक्के गुणांसह बंद झाली. त्यामुळे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर काही गुणांनी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही प्रथम यादीत प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश यादीत संधी मिळण्याची शक्यता असून त्यांनी २७ जूनला जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी प्रथम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याने या यादीत आपले नाव पाहण्यासाठी महाविद्यालय आवारात गर्दी केली. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी २५ जूनपर्यंत प्रवेश घ्यायचा असून त्यानंतर उर्वरित जागांसाठी २७ जूनला दुसरी यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीनुसार केटीएचएम महाविद्यालयाची विज्ञान विभागाची प्रथम यादी खुल्या प्रवर्गासाठी ९२.२०% गुणांसह बंद झाली, तर आरवायके विज्ञान महाविद्यालयात ९४ % आणि व्ही. एन. नाईक महाविद्यालयात ९२.४० % गुणांना पहिली यादी बंद झाली.
पहिली यादी ९२ टक्क्यांवर बंद
By admin | Published: June 22, 2016 11:44 PM