नाशिक : महर्षी चित्रपट संस्था लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करून देण्याचे स्तुत्य काम करीत आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यानेच कलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी केले. दरम्यान महर्षी चित्रपट संस्थेतर्फे आयोजित पाचव्या महर्षी लघुपट महोत्सवात नाशिकच्या रवी पगार यांच्या ‘नाऱ्या’ लघुपटास प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. दरम्यान यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेले डॉ. अतुल वडगावकर, आशा व गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघ, मानव उत्थान मंच आणि छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा सत्कार करण्यात आला.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात गुरूवारी (ता.३०) सायंकाळी हा सोहळा पार पडला. महर्षी लघुपट महोत्सवात आलेल्या साठ लघुपटातून ‘नाऱ्या’ लघुपटाने बाजी मारली. पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार बुलढाण्याचे सुरज वाडेकर यांच्या ‘अवर एनव्हॉयर्नमेंट’, तर तृतीय मुंबईच्या अनमोल कनोजिया यांच्या ‘तितली’ लघुपटाला मिळाला. उत्तेजनार्थ नाशिकच्या संजीव सोनवणे यांच्या ‘ग्लोबल मोबाईल, भारद्वाज पगारे यांच्या ‘वावरी’, बबन नागरे यांच्या ‘विधेय’ लघुपटास पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कांचन पगारे, शिल्पी अवस्थी, मोहन अडांगळे, पी. कुमार, खुशाल बर्वे, राजेश गांगुर्डे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रमोद नाईक, तुषार गुप्ते, ईश्वर जगताप आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना गाडीलकर यांनी अनेक ठिकाणी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होत नसताना हे व्यासपीठ आणि सन्मान करून या कलावंतांचा हुरुप वाढविण्याचे कार्य संस्थेने असेच सुरू ठेवावे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिकांत पगारे यांनी तर सूत्रसंचालन योगेश बर्वे, राजू शिरसाठ यांनी केले.