नाशिक : रमजान पर्वला रविवारी (दि.२८) रात्रीपासून उत्साहात प्रारंभ झाला. मुस्लीम समुदायाने पहाटे अल्पोपहार घेऊन पहिला उपवास (रोजा) सुरू केला. शहरातील बहुतांश कुटुंबांतील बालगोपाळांनी उपवास ठेवला आहे. पहाटेपासूनच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी झाली होती.‘रमजानुल मुबारक’ हा उपवासांचा महिना म्हणून परिचित आहे. मुहम्मद पैगंबर यांच्या अनुयायांचा महिना म्हणून धर्मग्रंथांमध्ये रमजानचा उल्लेख आढळतो, असे धर्मगुरू सांगतात. महिनाभराच्या कालावधीमध्ये मुस्लीम समाज अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देताना दिसून येतात. पहाटे साडेचार वाजेपासून तर संध्याकाळी सव्वासात वाजेपर्यंत उपवासाचा कालावधी निश्चित आहे. जवळपास पंधरा तासांचा निर्जळी उपवास मुस्लीम बांधवांनी रविवारी ठेवला. संपूर्ण महिनाभर पंधरा तासांचा उपवासाचा कालावधी राहणार आहे. पहाटेच्या नमाजपठणापासून पुढे चार वेळेच्या नमाजच्या वेळी आणि रात्री उशिरा केवळ रमजानच्या महिन्यात पठण केल्या जाणाऱ्या ‘तरावीह’च्या नमाजसाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी उसळली होती.
बालगोपाळांचाही पहिला ‘रोजा’ : रमजानला प्रारंभ
By admin | Published: May 28, 2017 10:37 PM