नाशिकरोड : देशभरातील चर्मकार समाजातील सर्व पोटजातींनी एका झेंड्याखाली एकत्रित येण्याची गरज असून, सत्ताधाऱ्यांना समाजाची ताकद दाखविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बबन घोलप यांनी केले.शिर्डी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना घोलप म्हणाले की, चर्मकार समाजाच्या सर्व पोटजातीच्या बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दिसत नाही. समाजाला काही पाहिजे असेल तर ते एकजुटी शिवाय मिळत नाही. व्यासपीठावर बसलेले चर्मकार समाजातील नेते कोणत्याही पक्षाचे असू द्या त्यांनी त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक रहावे. मात्र चर्मकार समाजावर कोणी अन्याय करत असेल तर त्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून चर्मकार महासंघाच्या भूमिकेबरोबर रहावे, असे आवाहन घोलप यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, अनु.जाती-जमाती केंद्रीय आयोग अध्यक्ष पी. एल. पुनीत, डॉ. दांडगे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदले, आमदार संजय सावकारे, आमदार, भाऊसाहेब कांबळे, आमदार सुभाष साबणे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार नारायण कुचे, आमदार योगेश घोलप, पंढरीनाथ पवार, सरोज बिसुरे, भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, उर्मिला ठाकरे आदिंसह देशभरातील चर्मकार समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंतन शिबिराला देशभरातून दीड हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चर्मकार संघांचे पहिले अधिवेशन
By admin | Published: March 08, 2016 11:35 PM