नाशिक : जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि.२९) १० केएल क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात ४० ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला ३७ मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणार असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता १० केएलने वाढणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची अंतर्गत ऑक्सिजनची क्षमता २० केएलची होती. पंरतु निर्माण करण्यात आलेल्या या नव्या प्लांटमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३० केएल झाली आहे. निर्माण करण्यात आलेल्या या प्लांटमुळे नव्याने वाढविण्यात आलेल्या दीडशे बेडला पुरकव्यवस्था म्हणून या प्लांटचा उपयोग होणार आहे, असे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.