नाशिक : झटपट जास्त पैसे मिळविण्याच्या नादात दोघा तरुणांनी गुन्हेगारीची वाट निवडली. पंचवटी भागातून अगोदर दुचाकीची चोरी केली अन् त्याच दुचाकीचा वापर पुढे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यासाठी सुरू केला. यामधील एक युवक हा सराईत सोनसाखळी चोर असून त्याने दुसऱ्या नव्या साथीदाराला सोबत घेत एक दोन नव्हे तर तब्बल सात महिलांच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळ्या हिसकावून पोलिसांना आव्हान दिले होते. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिताफीने सापळा रचून दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे.
पंचवटीतील अमृतधाम येथे राहणारा संशयित ओमकार नंदकिशोर बागोरे (२३) व मुसा अय्युब सैय्यद (३६, रा. आडगाव) या दोघा संशयितांनी शहरात मागील चार महिन्यात म्हसरूळ, आडगाव, मुंबईनाका, अंबड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मुसाविरुद्ध यापुर्वीही सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून होंडा शाइन मोटारसायकलीची चोरी केली होती. तसेच म्हसरुळ पोलिस ठाण्याच्याही हद्दीतून दुचाकी लांबविली होती. या दोन्ही दुचाकींचा ते सोनसाखळी चोरीसाठी वापर करत होते.
त्यांच्याकडील इतर दोन दुचाकींचा तपास केला जात असून त्यांनी या दुचाकी कोणत्या परिसरातून चोरी केल्या याचाही शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या लगडसह, १ लाख ३० हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासाकरिता त्यांना म्हसरूळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे....असे आले दोघे जाळ्यात!हे दोघे चोरटे अमृतधाम येथे येणार असल्याची गोपनीय माहिती अंमलदार मुक्तार शेख यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ यांना कळविले. तातडीने त्यांनी पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले.पथकाने अमृतधाम भागात सापळा रचून संशयित ओमकार व मुसा यांना शिताफीने बेड्या ठोकल्या. दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी पंचवटी परिसरातून दुचाकी चोरी करून तिचा वापर गुन्ह्यात केला.