देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशकात ; वकील परिषदेचे करणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 08:05 PM2020-02-14T20:05:27+5:302020-02-14T20:07:54+5:30
नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत.
नाशिक : शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी शुक्रवारी (दि.१४ ) पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन आणि नाशिक वकील संघातर्फे आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे जिल्हा आवारात शनिवारी (दि.१५) सायंकाळी ५.५५ वाजता सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी व गोव्याचे अॅडव्होकेट जनलर देवीदास पंगम यांचीही प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर ७ वाजून २५ मिनिटांनी सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थितांना उद््घाटनपर भाषणातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या आवारात रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुसºया दिवशी रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजता भूषण गवई यांच्या अध्यक्षतेत प्रथम सत्रास प्रारंभ होणार आहे. यात ‘मार्चिंग टूवार्डस स्पीडी मॉडर्न ज्युडिशिअरी’ विषयावर भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए.एन.ए. नंदकर्णी, महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अॅड. शेखर नेफाडे व देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजेंद्र रघुवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात २ ते ३.३० वाजेदरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मननकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेत राज्यभरातील २६ ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात येणार असून, या दोनदिवसीय वकील परिषदेचा समारोप माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, महापौर सतीश कुलकर्णी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.