पावसाने दडी मारल्यानंतर या हंगामात शहरासह जिल्ह्यात पावसाने बुधवारी समाधानकारक हजेरी लावली. हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज ॲलर्ट’ बुधवारी दिला गेला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि पावसाने इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह गंगापूर धरण परिसर आणि शहरालाही झोडपून काढले. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस हा बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत सुरूच होता. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ३६.५ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. तसेच गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी संध्याकाळपर्यंत सुमारे २५२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. गुरुवारी दिवसभर धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला होता. दिवसभरात धरणाच्या परिसरात १८ मिमी इतका पाऊस पडला, तर शहरात केवळ १.१ मिमी पाऊस झाला. बुधवारच्या जोरदार पावसानंतर गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले होते. बुधवारी गोदाकाठाचा जलस्तर उंचावल्याने प्रभावित झालेल्या गोदाकाठालगतच्या भागात लहान विक्रेत्यांकडून आपल्या दुकानांची आवरासावर केली जात होती.
दमदार पावसानंतर गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर आले.
--इन्फो---
गोदावरीतून एक हजार ११० क्यूसेक पाणी
गंगापूर धरण समूहात पावसाचे दिवसभर प्रमाण कमी राहिल्याने गोदावरीची पाणीपातळी वेगाने कमी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत रामकुंडापासून पुढे १ हजार ११० क्यूसेक इतके पाणी प्रवाहित झाले होते. पावसाचा जोर ओसरल्याने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाण्याचा हा स्तर कमी होत गेला. रात्री ८ वाजेच्या सुमारास गोदावरीच्या होळकर पुलाखालून २७८.३३ क्यूसेक इतके पाणी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात प्रवाहित होते.
--पॉइंटर---
धरणांचा जलसाठा असा
गंगापूर - ५३.३५%
काश्यपी- २९.७५%
गौतमी- ३२%
---
पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान (मिमीमध्ये)
गंगापुर- १८, गौतमी- १२, त्र्यंबकेश्वर-१५, आंबोली-१५, काश्यपी-७
---इन्फो---
सराफ बाजाराचे व्हायरल व्हिडिओ जुनेच
सराफ बाजारात वाहणारे पावसाचे पाणी आणि दुकानांमध्ये शिरलेल्या पाण्याचे व्हिडिओ पूर्णत: बनावट असल्याचा खुलासा सराफ व्यावसायिकांनी केला आहे. बुधवारच्या पावसाने रात्री उशिरापर्यंतसुद्धा सराफ बाजारात फारसे पाणी साचलेले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर अशा पद्धतीने जुनेच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन सायबर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी सराफांनी केली आहे.
---इन्फो---
दुधस्थळी धबधबा खळाळला
गंगापूर गावाजवळील नाशिककरांच्या पसंतीचा दूधस्थळी धबधबा गुरुवारी सकाळी अधिक वेगाने कोसळताना पहावयास मिळाला. वीकेण्ड नसल्याने गुरुवारी फारशी गर्दी धबधब्याच्या परिसरात झालेली दिसून आली नाही; मात्र शनिवार, रविवारी नाशिककरांची पावले मोठ्या संख्येने धबधब्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---इन्फो---
आठवड्याचे शहराचे पर्जन्यमान असे...(मि.मी)
गुरुवारी (दि. १५) - ०.०
शुक्रवारी (दि. १६)- ३.३
शनिवारी (दि. १७)- ०.०
रविवारी (दि.१८) - ११.२
सोमवारी (दि. १९) -५.२
मंगळवारी (दि. २०) -७.७
बुधवारी (दि. २१) - २३.९
गुरुवारी (दि. २२)- १.१