नाशिक : साहित्य संमेलनाच्या यापूर्वीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात कधीही न झालेले बालसाहित्य संमेलन यंदा प्रथमच ९४ व्या नाशिकच्या साहित्य संमेलनात रंगणार आहे. या बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन करणार असून, साहित्य संमेलनाच्या इतिहासात असे प्रथमच घडणार आहे.
साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे. ग्रंथप्रदर्शनाचे आणि संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होईल. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार, यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना अध्यक्षीय सूत्रे प्रदान केली जातील. त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे भाषण होणार आहे. त्याच दिवशी रात्री नऊ वाजता निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल.
दिलीप प्रभावळकर ठरणार आकर्षण बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. प्रभावळकर यांची उपस्थिती बालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संमेलनात गांधीवादी विचारवंत आणि प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत आणि मूळ नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार मनोहर शहाणे यांचाही गौरव केला जाणार आहे. ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होणार आहे. सत्कारानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथावाचन आणि कथाकथन होणार आहे.
शेतकरी आंदोलनावर परिसंवाद संमेलनाच्या समारोपादिवशी सकाळी मराठी नाटक ‘एक पाऊल पुढे - दोन पावले मागे’ हा परिसंवाद शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा आणि लेखक-कलावंतांचे मौन हा परिसंवाद भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.