नाशिक : महाराष्ट्रात १८ ते १९ टक्के धगनर समाज असून, समाजाला इतिहास, कला, नृत्य, ओव्या, साहित्य, संस्कृती अशी संपन्न आणि समृद्ध परंपरा आहे. मात्र, राज्यभरात विखुरलेल्या या समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळात एकही साहित्य संमेलन झालेले नाही. त्यामुळे समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने सोलापूरमध्ये पुढील वर्षात प्रथम आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर बहुउद्देशीय नाट्यगृहात ७ व ८ जानेवारी २०१७ या कालावधीत दोन दिवसीय संमेलन पार पडणार असून, उद्घाटन व समारोपाचा कार्यक्रम खुल्या मैदानावर होणार आहे. धनगर समाज साहित्य, संस्कृती, इतिहास आदि विषयांवर लेखन करणाऱ्या सर्व जातीधर्माच्या साहित्यिकांसाठी संमेलनाचे व्यासपीठ खुले असल्याचे आयोजकांनी सांगितले. धनगर समाजावर लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा संमेलनात पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच आदिवाशी धनगर समाज साहित्यावर शिर्षकगीत ध्वनीफित तयार करणाऱ्या कवी, गीतकार यांना ५१ हजार रुपयांचे, तर ध्वनीचित्रफित शिर्षक गीत तयार करणारास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. गीत निवडीचे अधिकार संयोजन समितीकडे राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनात समाजाच्या साहित्य, इतिहास, संस्कृती, शिक्षण, उद्योग, माध्यमे, आरक्षण, राजकारण, युवा महिला व नोकरदार आदि विषयांवर चर्चासत्र होणार असून, संमेलनाचे दोन दिवस बौद्धिक, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. (प्रतिनिधी)
पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन जानेवारीत
By admin | Published: October 10, 2016 1:14 AM