नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, या परीक्षेच्या नियोजनासंदर्भात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक यांनी दिली. वैद्यकीय विद्याशाखेच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेबाबतची अधिकृत माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रथम वर्ष नवीन अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा व प्रथम वर्ष जुन्या अभ्यासक्रमाची पुरवणी परीक्षा दि.७ डिसेंबरपासून घेण्यात येणार असल्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी आवश्यक परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालयांना वितरित करण्यात आले असून, लेखी परीक्षेनंतर लवकरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात येणार आहे. या परीक्षेविषयी अधिकृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अफवा व तथ्यहीन माहितीपासून सजग राहण्याचे आवाहन डॉ. अजित पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.