येवला : वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे.तालुक्यातील पूर्व भागात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यातील आदिवासी बांधवांचे रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी मत्स्य व्यवसायाला चालनादिली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून आदिवासींचे स्थलांतर थांबलेच; परंतु स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाल्याने हाती जास्तीचे चार पैस मिळू लागले आहेत. याबरोबरच या कष्टकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्नही सुटला आहे. पूर्व भागातील पाझर तलावांमध्ये दरवर्षी या काळात आदिवासी कष्टकरी तरुण मत्स्यबीज सोडतात. तयार झालेले मासे पकडणे व विक्र ी करणे यातून चांगले पैसेही मिळतात. खवय्यांना ताजे मासे उपलब्ध होत आहे. यावर्षी तालुक्यातील १० पाझर तलावांमध्ये ४ लाख ८० हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. देवदरी येथील पाझर तलावात पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते मत्स्यबीज सोडण्यात आले. खरवंडीचे सरपंच दशरथ मोरे, पोलीसपाटील भास्कर दाणे, ज्ञानेश्वर मोरे, बहिरू मोरे, विठ्ठल हंबरे, भाऊसाहेब गोदावरे, पोलीसपाटील बाळू मोरे, विष्णू मोरे आदी उपस्थित होते.
येवला तालुक्यात मोठ्या संख्येने शेततळे आहेत. या शेततळ्यातसुद्धा शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करू शकतात. शेततळ्यात होणारे शेवाळ हे माशांचे खाद्य आहे. यातून शेततळे स्वच्छ राहील व मत्स्यव्यवसायातून उत्पन्नही मिळेल. यासाठी मत्स्यबीज तलावात सोडले आहे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती