नाशिक : जम्मू-काश्मीरमधील अनाथ मुलींचे शिक्षण, संगोपन करण्यासह काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे घेत धडपड करणाऱ्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेने नुकत्याच जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय सैन्य दलाला पाच अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिल्या.
दिल्ली येथे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवित या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक आणि काश्मीरवासीयांसाठी जिवाचे रान करणारे अधिक कदम यांच्या प्रयत्नांतून या रुग्णवाहिका देण्यात आल्या. या सर्व रुग्णवाहिका भारतीय सैन्य दलाच्या निगराणीत असतील. कुपवाडा व बारामुल्ला जिल्ह्यातील ग्रेस, माटील, केरन, तंगधार, उरी अशा विविध ठिकाणी या रुग्णवाहिका पोहोचविल्या जाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेव, तसेच राज्यसभा सदस्य खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम, कोटक महिंद्रा बँकेचे सचिव राघवेंद्र सिंह, भाजप नेते सियाम जाजू, राजीव कोरी, डॉ. वीरेंद्र, मोहन गिरी, नरसिंह लगड आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीदेखील या संस्थेच्या वतीने नागपूर येथून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते काश्मीर खोऱ्यात तीन अत्याधुनिक रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत. बीएसएफ जवानांनादेखील काही रुग्णवाहिका बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने याआधी दिलेल्या आहेत. यावेळी संस्थापक अधिक कदम यांच्यासमवेत नाशिकचे ऋषिकेश परमार आणि जळगाव येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
२२ॲम्ब्युलन्स