नाशिक : धुळे बाजूकडून शहरात एका मोटारीतून गांजा या अंमली पदार्थाची होणारी वाहतूक रोखण्यास आडगाव पोलिसांना यश आले. ९वा मैल येथे एक संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट मोटार अडविली असता त्या मोटारीच्या डिक्कीतून सुमारे ३२ किलो वजनाच्या दोन गोण्या भरून गांजा वाहून नेला जात असल्याचे आढळून आले. या गुन्ह्यात चालकासह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.शहर पोलीस आयुक्तालयाच्या ९वा मैल सिमावर्ती नाक्यावर आडगाव पोलिसांनी नाकाबंदी कठोर करत शनिवारी (दि.११) मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे वाहनांची झडती घेण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख हे गुन्हे शोध पथकासह सीमावर्ती नाक्यावर थांबले. यावेळी वरील वर्णनाची मोटार येताच ती पोलिसांनी अडविली आणि चालकासह त्यामध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगितले असता त्यांनी उतरून पळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी बंदोबस्तावरील पथकाने चालकाला जागीच पकडले तर उर्वरित पळून जाणाºया चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ‘अप्पांचा आशिर्वाद’ असे दर्शनी भागावर लिहिलेल्या वाक्यामुळे कार ओळखणे पोलिसांना सोपे झाले. पांढºया रंगाच्या स्विफ्ट डिझायर (एम.एच१८ एजे २१२३) मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता पाठीमागील बाजूस डिक्कीत प्लॅस्टिकच्या दोन गोण्या आढळून आल्या. या गोण्या उघडून तपासल्या असता यामध्ये गांजासारखा अंमली पदार्थाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ३२ किलो गांजासह १६ हजारांची रोकड, ४ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण ९ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांविरूध्द अंमली पदार्थाची अवैध वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक एस.डी.बिडगर हे करीत आहेत.