नाशिक : शहर व परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी आता दुचाकी चोरांना बेड्या घालण्यास सुरुवात केली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहर व ग्रामिण हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना वडाळागाव व पाथर्डीगावातून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार श्रीराम सपकाळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, सहायक निरीक्षक सचिन सावंत आदींचे पथक तयार केले. या पथकाने वडाळागावातील सावित्रीबाई फुलेनगर येतील घरकुल प्रकल्पाच्या इमारतींजवळ सापळा रचला. यावेळी संशयित दुचाकी चोर लियाकत ऊर्फ लकी तकदीर शाह (४०,रा. घरकुल प्रकल्प) हा त्याचा साथीदार अमोल ऊर्फ बंटी वसंत साळुंखेसोबत (३१,रा.पाथर्डीगाव) चोरीच्या ॲक्टिवा दुचाकीची विक्री करण्याच्या उद्देशाने आले असता साध्या वेशातील पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ॲक्टिवा दुचाकी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून तीन आणि शहरातून दोन अशा पाच चोरीच्या दुचाकींचा पोलिसांना ठावठिकाणा सांगितला. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहेत. या दोघा संशयितांना पुढील चौकशीकरिता भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.