महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेतील भाजपाच्या उपमहापौर यांच्यासोबत आणखी चार नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. नाशिकमधील परिस्थितीवर खासदार संजय राऊत वैयक्तिक पातळीवर लक्ष ठेवून असतात असं सांगितलं जातं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला राजकीय प्रत्युत्तर देत शिवसेनेनं भाजपाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.
नाशिकचे भाजपाचे उपमहापौर भिकूबाई बागुल यांच्यासह नगरसेवक प्रथमेश वसंत गीते, जयश्री ताजने, हेमलता कांडेकर, मुसीर सैय्यद यांनी आज भाजपाचा सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या या पाच जणांसोबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभू बागुल आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेनं आता बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. तसंच त्यांच्याच खांद्यावर नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.