नाशिकरोड : पळसे गावातील मळे परिसरात बिबट्या नर-मादीचा संचार असल्याची आणि अनेकांना दोन बिबट्यांचे दर्शन घडल्याची चर्चा होत असतानाच उसाच्या शेतात मजुरांना बिबट्याचे पाच बछडे आढळले आहेत. त्यामुळे परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, जवळपासच्या शेतमळे परिसरातच बिबट्या मादीचा संचार असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.पळसे येथील एमआयडीसी रस्त्यावरील भाऊसाहेब श्यामराव गायधनी यांच्या शेतात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कामगार ऊसतोड करीत असताना या मजुरांना शेतात बिबट्याचे पाच बछडे आढळून आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे.पोलीसपाटील सुनील गायधनी यांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाला कळविली असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बछड्यांची पाहणी केली. बछड्यांना या ठिकाणाहून हलविल्यास मादी बिबट उग्र होण्याची शक्यता गृहीत धरून तूर्तास बछडे आहे त्या ठिकाणीच ठेवण्यात आले आहेत. यामुळे गावात आणि परिसरातील शेतमळे परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.जेरबंदसाठी हीच वेळबिबट मादी बछड्यांसाठी याच परिसरात वारंवार दर्शन देण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतीकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे बछड्यांसाठी येथेच वास्तव्य करणाºया दोन्ही बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यापूर्वीदेखील पिंजरे लावण्यात येत होते मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे पाच बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:28 AM