येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के अपंग निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांना सदर निवेदन देण्यात आले. तालुक्यातील आडसुरेगाव, आहेरवाडी, आंबेगाव, बाळापुर, भारम, बोकटे, देशमाने, धामोडे, डोंगरगाव, गवंडगाव, जळगाव नेऊर, कातरणी, खैरगव्हाण, मानोरी बुद्रुक, मुखेड, नागडे, नायगव्हाण, पारेगाव, पाटोदा, पुरणगाव, राजापूर, रेंडाळे, साताळी, शिरसगाव लौकी, सोमठाण देश, सुरेगाव रस्ता, विसापूर या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत स्तरावरील अंपगांसाठी असणारा पाच टक्के निधी खर्च न केल्याची तक्रार प्रहारने सदर निवेदनात केली आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींनी अपंगांचा पाच टक्के निधी खर्च केलेला नसल्याने सदर ग्रामपंचायतींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा या ग्रामपंचायतींवर कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणी संबंधीत ग्रामपंचायतींवर तात्काळ कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहारने दिला आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख अमोल फरताळे, प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, संपर्क प्रमुख सचिन पवार, गणेश लोहकरे, रामभाऊ नाईकवाडे, जनार्दन गोडसे, शंकर गायके, संजय मेंगाणे, गोरख निर्मळ आदींसह पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष?र्या आहेत.गटविकास अधिका?र्यांशी चर्चा केलेली आहे. पाच टक्के निधी २०१९ -२०२० मध्ये का खर्च केला गेला नाही, याचे कारण स्पष्टपणाने लिखित स्वरूपात कळविण्याची मागणी केली आहे. गटविकास अधिकारी यांनी ०३ आॅगस्ट २०२० ला २७ ग्रामपंचायतींना पत्र काढले तरीपण या २७ पैकी एकाही ग्रामपंचायतींनी येवला पंचायत समितीला खर्च का केला नाही, याचे कारण दिलेले नाही. येत्या आठ दिवसात लिखित स्वरूपात पंचायत समितीने कळवले नाही तर सर्व अपंगांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडेल.- अमोल फरताळे, तालुका प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.