नाशिक : जिल्ह्यासह शहरातही आता कोरोनाचा फास अधिक भक्कम होत चालला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून गावठाण व झोपडपट्टी भागांत कोरोनाचे रूग्ण सातत्याने आढळून येत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. वडाळागावात रविवारी (दि.२४) संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार एकूण ५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. आता वडाळागावातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ९ झाली आहे.
तसेच सिडको राणाप्रताप चौकात-२, कॉलेजरोड-२, लेखानगर-३ रूग्ण असे एकूण १२ नवे रू ग्ण आढळून आले आहेत. शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ८८ तर जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांची आकडा ९५० इतका झाला आहे. आज दिवसभरात येवला तालुक्यातील मुखेडगाव व मनमाडच्या सायेगावात प्रत्येकी १ कोरोनाग्रस्त रुग्ण मिळून आला.शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ७ झाली आहे. शिवाजीवाडी झोपडपट्टीत अद्याप २कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी वडाळागावात आढळून आलेले पाच नवे रुग्ण अण्णा भाऊ साठेनगरजवळ असलेल्या मुमताजनगर परिसरातील आहे. हा परिसर अत्यंत दाट अशा लोकवस्तीचा असून एकमेकांना घरे लागून आहेत. तसेच परिसरात अस्वच्छता कमालीची असून भंगारमालाची गुदामे, प्लॅस्टिकची गुदामे अधिक आहेत.शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.