नाशिक : जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिलाआहे. पाटबंधारे खात्याने ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन पूर्ण केले असून, २५ ते ३१ आॅक्टोबर या दरम्यान एकाच वेळी तिन्ही समूहातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीद्वारे सोडल्या जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, असे कृत्य कोणी करू नये तसेच पाण्याचा अधिकृत व अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे खात्याने प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे. गोदावरी नदीवरील नांदूरमधमेश्वर बंधारे ते प्रवरा संगमादरम्यान असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयातील फळ्या काढून घेण्यात याव्यात. ज्यांनी पाणी अडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दारणा, गोदावरी, कादवा नदीतून ६ ते ८ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येणार असल्यामुळे नदीतील इंजिने, मोटारी व इतर साहित्य तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून घ्यावीत. पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाल्यास पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात उतरणे, पाण्याची चोरी करणे, पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे व रा. पा. भाट यांनी दिला आहे.
उद्यापासून पाच दिवस पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:54 AM