मालेगाव : गेल्या शनिवारी टेहरे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर प्रकाश महादू बोरसे (६०) यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत बोरसे यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मद्यपी पित्याची वागणूक आईसह कुटुंबियांना शिवीगाळ करीत असल्याचा राग मनात धरुन मुलानेच पित्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर व समाधान या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २२ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शनिवारी सकाळी बोरसे यांचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळून आला होता. धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर, गळ्यावर व पाठीवर वार करण्यात आले होते. त्यांच्या मृतदेहापासून २० ते २५ फुट अंतरावर सायकल आढळून आली होती. प्रारंभी हा घातपात व अपघाताचा संशय व्यक्त केला जात होता. शवविच्छेदन अहवालानंतर बोरसे यांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार वाडीले, उपनिरीक्षक राहूल कोलते, राहूल पाटील, एस. एस. चव्हाण यांच्यासह सहकाºयांनी खून प्रकरणातील संशयित आरोपी उघडकीस आणले. ज्ञानेश्वर याच्याविरुद्ध खुनाचा तर समाधान याच्याविरुद्ध पुरावा नष्ट केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे करीत आहेत.
पित्याचा खून करणाऱ्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:46 PM