नाशिक : शहरात डेंग्यूचा कहर कायम असून, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ६८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापौर आणि स्थायी समितीने बैठका घेऊनदेखील प्रशासनाकडून डेंग्यू आटोक्यात नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत डेंग्यू दूषित रुग्णांची संख्या ९३९ वर पोहोचली असून, चालू महिन्याच्या अखेरीस ही संख्या हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्याकमी होती. त्यामुळे प्रशासन निर्धास्त होते. जुनमध्ये शहरात डेंग्यूच्या रु ग्णांची संख्या अवघी दोन असल्याने त्या तुलनेत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण अधिक होते. परंतु, जुलै महिन्यात डेंग्यूने डोके वर काढले आणि जूनमधील दोन रुग्णांवरून ही संख्या एकदम ४८ वर पोहोचली. आॅगस्टमध्ये तर ११७ रुग्ण आढळले आणि त्यांनतर रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिला. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूबाधीतांचा आकडा हा १६५ पर्यंत गेला होता.आॅक्टोबर महिन्यात तर डेंग्यूचे गेल्या चार वर्षांचे सर्व विक्र म मोडलेत आणि २०७ रुग्ण आढळले, तर त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हा विक्रम मोडीत निघाला आणि ३२२ रुग्ण आढळले होते. यंदा पावसाळा लांबला अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत यंदा पाऊस असल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. आता पावसाळा नसतानाही १ ते ७ डिसेंबरपर्यंत डेंग्यूचे ६८ रु ग्ण आढळले आहे.शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपताच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आणि त्यानंतर आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची झाडाझडती घेतली होती.महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर सतीश कुलकर्णी यांनीदेखील तातडीने बैठक घेऊन नूतन वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना तंबी दिली होती. आठवडाभरात रुग्ण संख्या कमी न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र आता पदाधिकारी काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.संख्या हजाराच्या घरातशहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी संख्येमुळे डिसेंबरपर्यंत रुग्ण संख्या हजारापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूचे ९८१ रु ग्ण होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील रुग्ण संख्या विचारात घेतली तर आत्तापर्यंत ९३९ रुग्ण आढळले आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात डेंग्यूचे ६८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:07 AM