सिन्नर/पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत औरंगाबादकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर उलटला. सकाळी अकरा वाजेच्या सदर अपघात घडला. गॅस गळतीमुळे परिसरात घाबराहट निर्माण झाली होती व पाच तास परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. चार क्रेन व कंपनीच्या रेस्क्यू पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गळती थांबून टँकर उभा केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला.पाथरे येथील भारत पेट्रोलियम पंपा समोर एच.पी. कंपनीचा गॅसचा टँकर उलटला. टँकर मध्ये एलपीजी गॅस १७ टन, टँकरचे वजन १२ टन गॅस सह २९ टन वजन होते. टँकर जवळच वस्त्या असल्याने गॅस गळतीनेभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परिसरातीलवीज पुरवठाही सहा तास खंडित करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ दराडे यांच्यासह मनोज पगारे, संतोष थेटे, विलास साळुंखे, अरुण शिरसाठ यांच्या सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते.गॅस गळतीने सिन्नर - शिर्डी रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. घटनास्थळी कोपरगाव नगरपरिषद, सिन्नर नगरपालिका, संजीवनी साखर कारखाना येथील अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते. सिन्नर येथील एच.पी.गॅस संबंधित रेस्क्यु अधिकारी हजर झाले. पण क्रेनची वाट पहावी लागल्याने वाहतूक खोळंबली होती. साधारण सकाळी ११ वाजता उलटलेला झालेला टँकर चार क्रेनच्या सहाय्याने ६ वाजता सुव्यवस्थित रस्त्यावर आणण्यात आला.
पाच तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 9:35 PM