मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील रेल्वेपुलावर सकाळच्या सुमारास ट्रक बिघडल्याने जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एक वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच चांदवड-मनमाड या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांमुळेदेखील मनमाड येथील मालेगाव चौफुलीवर वाहतूक कोंडी झाली. यामुळे मनमााड-चांदवड, मनमाड-मालेगाव, मनमाड-नांदगाव, मनमाड-येवला या चारही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंदूर-पुणे राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून नेहमीच या मार्गावरील वाहतूक कोंडीला वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागते.
येथून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव चौफुलीवर आज पाच तास वाहतूक विस्कळीत झाल्याने मालेगाव नाक्यावर चारही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शहरातून जाणारा इंदूर-पुणे रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरश: चाळण झाली. आज सकाळी रेल्वेपुलावर एक ट्रक नादुरुस्त झाला, मात्र त्यास बाजूला घेता येत नसल्याने जागेवर दुरुस्त करावा लागला, तर चांदवड रस्त्याचे नवीन काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक त्यात याच मार्गावर बाजार समिती असल्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची गर्दी तसेच नांदगाव रोडने इंधन भरलेल्या टँकरची गर्दी अशा सर्व मोठ्या वाहतुकीत घुसणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली. महामार्गावर चार ही मार्गावर ४ -५ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा या वाहतूक कोंडीत खोळंबा झाला. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणे प्रवाशांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच या महामार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते.
--------------------------
शहर पोलीस चौकी बंद
गेल्या ११ महिन्यांपूर्वी वाहतूक पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरून मनमाड शहरातील पोलीस चौकी बंद करण्यात आली. पोलीस चौकी बंद असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती राहिली नाही. पोलीस चौकी बंद असल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
----------------------
इंदूर-पुणे राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीदेखील झाली आहे. शहरातील पोलीस चौक्या बंद असून, त्वरित सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- एस. एम. भाले, सामाजिक कार्यकर्ते
------------------------
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह वाहनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ऐनवेळी या रस्त्यातच वाहन बंद पडल्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो.
- सुनील वानखेडे, वाहनधारक
---------------------