येथील पेट्रोल पंपावर चार, एका किराणा व्यापाऱ्याकडे व अन्य एका व्यावसायिकाकडे चलनात पाचशेच्या बनावट नोटा आढळून चर्चा सुरू आहे. सुरगाणा शहर व तालुका परिसरात या पाचशेच्या बनावट नोटा काही लाखांत असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे गुजरात व महाराष्ट्र पोलीस यांच्यापुढे याप्रकरणी पाळेमुळे खोदण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
गुजरात पोलिसांनी बनावट नोटांची उकल केल्यानंतर गुजरात सीमेलगत महाराष्ट्रातील चार संशयित आरोपी फरार झाले होते. १५ जून रोजी वापी येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक करून वापी न्यायालयात हजर केले असता, चौघांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यात सुरगाणा तालुक्यातील हरिदास ऊर्फ हरेश सोनीराम चौधरी (रा. मांधा पैकी चिकारपाडा), कृतेश ऊर्फ अजय देवराम बोचल (रा. टेंबरूनपाडा), भगवंता ऊर्फ भगवान सुकर डंबाळे (रा. गुही), जयसिंग लक्ष्मण वळवी (रा. गुही) या चार जणांचा समावेश आहे. यातील आणखी एक संशयित फरार असून, तो करंजुल (सु) येथील रहिवासी असल्याचे समजते. गुजरात तसेच सुरगाणा येथील पोलीस त्याच्या मागावर आहेत. या बनावट नोटा तालुक्यात तसेच इतर ठिकाणी चलनात असल्याचे काही ठिकाणी आढळून येत आहे. शहरातील एका पेट्रोल पंपावर चार नोटा तर एका किराणा माल व्यापाऱ्याकडे चार बनावट नोटा तसेच किरकोळ कापड दुकानात एक नोट बनावट आढळून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तालुक्यात दहा लाखांहून अधिक बनावट नोटा चलनात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो
स्थानिक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह
तालुक्यातील निरक्षरतेमुळे खऱ्या नोटांची ओळख पटवण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. तालुक्यात छपाई होत असलेल्या लाखो रुपयांच्या नोटा चलनात आणल्या जातात. मात्र, याचा सुगावा स्थानिक प्रशासनाला कसा लागला नाही, तसेच फरार संशयित तीन दिवस उलटूनही हाती लागला नाही, याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.