भगूर : येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. भगूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकला होता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर भगूर नगरपालिकेने रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊन तांत्रिक सपाटीकरण न चुकीच्या पद्धतीने करून, साधारण एक कोटी ३५ रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप न टाकता कथडा बांधल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावरच साचत आहे. वाहकधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, रविवारच्या किरकोळ पावसाने या रस्त्यावर पाणी साचले, पावसाळ्यात तर रस्त्यावर हौदासारखी परिस्थिती होईल, असे बोलले जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे. इगतपुरीला जोडणाऱ्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता भगूर पालिकेने दखल घेऊन या रस्त्याची फेरदुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहन भिकाजी करंजकर यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेने रस्त्याची परिस्थिती न पाहता, अतांत्रिक पद्धतीने तो बांधला तसेच रस्त्याला कथडा केल्यामुळे पाणी साचते.न्यायालयात दावाभगूरचे माजी नगराध्यक्ष पां. भा. करंजकर याच्या मालकीची जागा या रस्त्यात जात असून, त्याचा मोबदला मिळावा म्हणून करंजकर यांनी न्यायालयात दावा दाखल करून पालिकेकडे पैशाची मागणी केली आहे. त्यामुळेच नगरपालिकेने घाईघाईने रस्ता तयार केल्यामुळे तो चुकीचा झाल्याचे बोलले जात आहे.
भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:13 AM