नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर कारवाई करीत एका कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ६६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करून कार जप्त केली आहे.याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने शहरासह जिल्ह्णात भरारी पथके सक्रिय झाली आहेत. तसेच सीमावर्ती नाकेही कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडणूक काळात मद्याची होणारी तस्करी रोखणे, जेणेकरून कायदासुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, या उद्देशाने धडक कारवाई केली जात आहे.त्यानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव टोल नाक्यावर आलेल्या कारची (एम.एच १५जीआर ७९१६) झडती घेतली असता कारमध्ये विदेशी मद्याच्या १३७ बाटल्या आढळून आल्या. या मद्याची किंमत ५ लाख ६९ हजार ६६० रु पये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यामुळे पथकाने अविनाश भामरे आणि राहुल गांगुर्डे (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) या संशयितांना अटक केली आहे.भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे, दुय्यम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान सोमनाथ भांगरे, विष्णु सानप, साक्षी महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पाच लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 2:00 AM