नाशिक : महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीसाठी प्रतिबंधित असलेला परराज्यातील सुमारे पाच लाखांचा मद्यसाठा व दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी (दि़११) पेठ व सुरगाणा परिसरात पकडला आहे. गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी व भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. पेठ व सुरगाणा परिसरात गस्त घालणाऱ्या राज्य उत्पादनच्या तीन क्रमांकाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे़भरारी पथक सुरगाणा तालुक्यातील मौजे उंबरठाण येथे सापळा रचून दोन संशयास्पद कारची (एमएच १५ डीएस ९३८६ व जीजे ०५ एफएफ ५०६५) तपासणी केली़ या कारमध्ये दमणनिर्मित व केवळ दमणमध्ये विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला़ पथकाने या दोन कारसह ४ लाख ९० हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित दिनेश विठ्ठल महाले व मणिराम काशीनाथ पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे़विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूतयांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान महेश सातपुते, लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, सुनीता महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
परराज्यातील पाच लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:33 AM