प्रवीण साळुंके - मालेगाव येथील महानगरपालिका हद्दीतील डेंग्यू रुग्णांच्या रक्ताचे तपासणीसाठी पाठविलेल्या एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांपैकी पाच नमुने बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. यामुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने खोलवर हातपाय पसरले असल्याचे उघड झाले आहे. पाठविलेल्या नमुन्यांत एका दिवसाचे इतके, तर गेल्या चार महिन्यांत किती रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाही महानगरपालिकेचे अधिकारी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करत नाहीत, हे विशेष. शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू आजाराने बाधित रुग्ण असून, महानगरपालिका यातील काही रक्ताचे नमुने गोळा करते. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येतात. येथील महानगरपालिकेने २७ नोव्हेंबर रोजी शहरातील तापाच्या आजाराने बाधित झालेल्या सहा जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा मनपाला अहवाल प्राप्त झाला असून, यातील तब्बल पाच जणांच्या रक्ताचे नमुने डेंग्यूबाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात पाच महिला व एक पुरुष असून, यातील पाच रुग्णांचे वय सात वर्षांच्या आत आहे. या सहापैकी ४४ वर्षीय रहेना या महिलेचा अहवाल बाधित नसून उर्वरित मुन्शीबा (८ महिने), मदिहा (५ वर्षे), अफिया (५ वर्षे), समरीन (७ वर्षे), म. जाहिद (५ वर्षे) यांना डेंग्यू झाल्याचे अहवालात उघड झाले आहे.या एसबीएचजीएमसी/४३९/१४ अहवालावरून शहरात डेंग्यूच्या रुग्णांचा अंदाज येतो. त्यानंतर आरोग्य विभागाने २८ नोव्हेंबरला सलिमा रियाज अहमद (वय ७२) व जव्हेरीया फिरोज अहमद (वय १२) या दोघा महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी धुळे येथे पाठविले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यापैकी एकीला म्हणजे जव्हेरियाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असतानाही येथील महानगरपालिका शहरात डेंग्यूची साथ नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहे, हे विशेष.
एकाच दिवसाच्या सहा नमुन्यांत पाच बाधित
By admin | Published: December 25, 2014 1:45 AM